सातारच्या तिरंदाज प्रवीण जाधवचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
सातारा – सातार जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे गावाच्या भूमिहीन शेतमजुराचा मुलगा असलेला तिरंदाज प्रवीण जाधव आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज झाला आहे. पालकांनी मोलमजुरी करून प्रवीणच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठी काबाड कष्ट केले व आता त्यांचे पांग फेडण्यासाठी प्रवीण जपानमधून मायदेशी येताना पदक घेऊन येण्याच्या इर्षेने झपाटला आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत कोणत्याही सुविधांशिवाय प्रवीणने आपली साधना केली.
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेशाची पात्रता मिळवत त्याने अशी कामगिरी करणारा राज्याचा पहिलाच तिरंदाज बनण्याचीही लक्ष्यवेधी कामगिरी केली. पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) येथे 6 ते 8 मार्चदरम्यान झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीत
तीन वेळा देशाचे प्रतिनिधित्व करणारे अव्वल तिरंदाज अंतानू दास आणि तरुणदीप रॉय यांनाही मागे टाकत प्रवीणने 70 मी. प्रकारात आठव्या प्रयत्नांत 2 हजार 727 गुण मिळवून ऑलिम्पिक पात्रता मिळवली.
प्रवीण हा सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील सरडे गावामधील भूमिहीन शेतमजूर रमेश जाधव यांचा मुलगा. त्याने 2006 ते 2011 या कालावधीत अमरावती येथील शासनाच्या तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनीत सरावाला सुरुवात केली. येथेच तो प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्याकडून मार्गदर्शन घेत होता. भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले. प्रवीणने तिरंदाजीत खरोखर पोतंभर पदके प्राप्त केलेली आहेत.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत चक्क एका नाल्याजवळ बांधकाम केलेल्या दोन खोल्यांमध्ये प्रवीण आपल्या कुटुंबासह राहात होता. मिळालेली पदके ठेवायलाही जागा नसल्याने त्याने चक्क ही पदके पोत्यात भरून ठेवली आहेत. ज्या घरात कधी धान्याने भरलेले पोते दिसले नाही तिथे पदकांची रास प्रवीणने ओतली.
थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या मुलाच्या यशामुळे त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहात आहे. घरापासून आपल्या खेळातील कारकीर्दीसाठी लांब राहिलेल्या प्रवीणकडून केवळ राज्यालाच नव्हे तर देशाला टोकियोतील पदकाची आस आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. शाळेतील शिक्षक विकास भुजबळ यांनी प्रवीणचे कौशल्य ओळखून त्याला तिरंदाजीसाठी प्रवृत्त केले.