मोक्कामधील प्रशांत जोशी जेरबंद
पुणे – मोक्का लावलेल्या रवींद्र बऱ्हाटे टोळीतील फरार आरोपीस पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 च्या पथकाने अटक केली. त्याने एका जमिनीच्या व्यवहारात महसूल दप्तरी हरकत घेऊन तडजोडीसाडी तीन कोटींची मागणी केली होती. टोळी प्रमुख रवींद्र बऱ्हाटे मात्र अद्यापही इतर साथीदारांसह फरार आहे.
प्रशांत पुरुषोत्तम जोशी (46, रा. कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी रवींद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, परवेझ जमादार, जयेश जगताप, प्रशांत जोशी, प्रकाश फाले, संजय भोकरे, विशाल तोत्रे, प्रेमचंद रतनचंद बाफना, प्रशांत बाफना, हरीष किरण बाफना, राज किरण बाफना , विनय मुंदडा यांनी 2016 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यान आपसात संगनमत करून कट रचला होता.
यामध्ये फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचेविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून फिर्यादी यांचे मालकी, वहीवाटीची व ताब्यात असलेली पर्वती सहकारनगर येथील जमिनीचा व्यवहार करुन फिर्यादीच्या सहकाऱ्यांकडून 70 लाख रुपये घेतले होते. त्यांचा फसवणूक व विश्वासघात केला. फिर्यादी यांची जमीन बळकविण्यासाठी महसुल दप्तरी हरकती घेऊन जमिनीच्या व्यवहारात तडजोडसाठी 3 कोटी रुपयाची मागणी केली. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
दरम्यान युनिट -1 गुन्हे पुणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अमंलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना खबर मिळाली की, प्रशांत जोशी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी गांधी भवन स्मारक कोथरुड येथे येणार आहे.
पोलीसांनी त्या भागात सापळा रचून संशयीत जोशी यास ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त(गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस सुरेन्द्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली.