शिक्षणाला पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

राजगुरुनगर: एकीकडे देशात चंद्रावर यान पाठवण्यात येतंय तर दुसरीकडे मात्र शिक्षणासाठी देखील पैसे नसल्याने तरुणांना आत्महत्या करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. निसर्गाचा झालेला कोप आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना किवळे (ता. खेड ) येथे घडली आहे. धनंजय बाळू म्हसे (वय १९ ) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजयचे वडील बाळु बबन म्हसे वय (४३ ) यांनी मुलांच्या शिक्षणासाठी हात उसने पैसे घेतले होते. शेतात बटाटे लावले असल्याने त्याच्यातून आलेल्या पैस्यानी या हातउसण्या पैशायंची परत फेड करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु शेतात लावलेले बटाट्याचे पीक पावसामुळे खराब झाले.

त्यानंतर पुन्हा शेतात धना, मेथी टाकली होती. यातून थोडेफार पैसे मिळतील अशी अशा या शेतकऱ्यांच्या मुलाला होती. परंतु अवकाळी पावसामुळे या पिकाचे देखील नुकसान झाले. त्यामुळे हात उसने घेतलेले पैसे फेडायचे कसे, असा प्रश्न धनंजयला सतावत होता. त्याला बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे तो दोन महिने चाकण येथे हे एका खासगी कंपनीत कामासाठी जात होता. आई मोलमजुरीचे काम करत होती.

आपल्या वडिलांवरील कर्जाचा डोंगर वाढल्याने धनंजय नेहमी चिंताचा ग्रस्त असायचा. बुधवारी (दि. ५ ) वडील गुरे घेऊन रानात गेली असताना,या कर्ज बाजारीपणाला कंटाळून बुधवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास धनंजयने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)