पवनानगर – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची “ई-केवायसी’चे 100 टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आहे. यासाठी मावळ तालुक्यात बुधवारी (दि. 7) पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नायकवडी यांनी तिकोना, पाचाने या गावात आयोजित केलेल्या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पीएम किसान “ई-केवायसी’ त्वरीत करावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
मावळ तालुक्यातील दौऱ्याच्या वेळेस तिकोना, पाचाने येथील शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रफीक नायकवाडी यांनी तिकोना व पाचाने गावातील सीएससी सेन्टरवर जाऊन शेतकरी लाभार्थी यांच्याशी संवाद साधला. तसेच ई-केवायसी काम सुरू असल्याची खात्री केली. ई-केवायसीचे काम 100 टक्के पुर्ण करण्यासाठी मावळ तालुक्यातील गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी लाभार्थीच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध करणे, गाव पातळीवर काम करणारे कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांनी लाभार्थीशी प्रत्यक्ष संपर्क करणे, प्रचार प्रसिद्धी करणे, याबाबत सूचना देण्यात आल्याचे रफीक नायकवडी व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
विशेष मोहीम शिबिर राबविणार
ई- केवायसी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांनी हे काम करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असल्याचे रफीक नायकवाडी यांनी सांगितले.
ई-केवायसी कार्यपद्धती
गावातील प्रलंबित यादीतील लाभार्थीना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल याचे मार्फत वैयक्तिकरित्या समक्ष भेटीद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क करतील. मोबाइलद्वारे ई-केवायसी करण्यासाठी “मी पीएम किसान’ ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून ई-केवायसी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
मावळ तालुक्यातील पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पोर्टलवर नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांच्याशी संपर्क करून तात्काळ पोर्टलवर ऑनलाईन ई-केवायसी करावी किंवा पीएम किसान ऍप डाउनलोड करून स्वतः ई-केवायसी करावी.
– रफीक नायकवडी, विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग.