पिंपरी – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा पक्षाच्या वतीने सर्वेचे काम सुरू आहे. सर्वेमध्ये भाजपचा अथवा मित्र पक्षाचा उमेदवार विजयी होत असल्याचे स्पष्ट होत असल्यास त्याठिकाणी वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन उमेदवारीचा निर्णय होईल, असे मावळ लोकसभा मतदार संघाचे भाजपचे संयोजक तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी बुधवारी (दि.7) पत्रकार परिषदेत सांगितले.
मावळ आणि शिरुर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून शिवसेनेकडेच आहेत. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये आलेल्या वितुष्टानंतर भाजपने या दोन्ही मतदारसंघात तयारी सुरू केली होती. परंतु गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी सेनेतील आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तसेच मावळमधील विद्यमान खासदार आणि शिरुरचे माजी खासदार देखील शिंदेंच्यासोबत असल्याने हे मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे जाणार की भाजप यावर दावा करणार अशा चर्चा सुरू आहेत. अशा वातावरणात भाजपच्या नेत्यांनी सर्वे सुरू असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या आपला दावा सांगितला आहे.
भेगडे म्हणाले की, राज्यात सत्तेत सोबत असलो तरी येणाऱ्या काळात पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल. युतीचा निर्णय, मतदारसंघ ज्या पक्षाला जाईल, त्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणे आणि 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सूत्रे देणे ही भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपच्या वतीने दि. 30 मे ते दि. 30 जून दरम्यान देशभर लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष जनसंपर्क अभियान (मोदी 9) संपन्न होत आहे. यानिमित्त मावळ लोकसभा मतदार संघात जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र व बूथ स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी चिंचवडे, उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते एकनाथ पवार आणि नामदेव ढाके, माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे, संयोजक ऍड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
मावळमध्ये केलेल्या सर्वेत भाजपला अनुकूल वातावरण असल्यास या मतदार संघावर दावा करणार का याबाबत संयोजक भेगडे यांना विचारले असता ते म्हणाले, संयोजक म्हणून काम करताना मावळ, शिरूरमध्ये सर्वेच्या माध्यमातून आमचे काम चालू आहे. सर्वेमध्ये भाजपचा अथवा मित्र पक्षाचा उमेदवार विजयी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन उमेदवारीचा निर्णय होईल. भाजप असो की मित्र पक्ष त्या ठिकाणी ठिकाणी ताकदीने लढू आणि जिंकू, असेही भेगडे म्हणाले.
शिरूरसाठी मी तर 2019 पासूनच तयारी करतोय – आमदार लांडगे
शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना यांचे पारंपारिक मतदार संघ आहेत. मात्र, या दोन्ही मतदार संघात भाजपकडून सर्वे सुरू असून या मतदार संघातून भाजपचा उमेदवार असेल किंवा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे उमेदवार असतील का? याबाबत लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले मी तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच तयारी करतोय, असे त्यांनी म्हटले.