विजय लाड
कोयनानगर – तांत्रिक अभियांत्रिकीचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आयएसओ मानांकनप्राप्त कोयना प्रकल्पात सध्या अभियंत्यांचा दुष्काळ जाणवत आहेत. या प्रकल्पाच्या विविध विभागांमध्ये 99 पेक्षा जादा अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. देशात दर्जाचे दुसरे नाव असलेल्या कोयना प्रकल्पाला शासनाच्या उदासीन कारभाराचा फटका बसत आहे. हे पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या राज्याला नक्कीच भूषणावह नाही.
राज्यातील जनतेच्या उत्कर्षासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नांनी कोयना धरणाची निर्मिती साडेसहा दशकांपूर्वी झाली. कोयना धरण हे केवळ दगड, सिमेंट, विटांची निर्जीव वास्तू नाही, तर अनेक कामगार, अभियंत्यांनी जीव ओतून, मराठी मातीचा चिवटपणा आणि जिद्दीने हा प्रकल्प उभारला. कोयना धरणावर अनेक प्रकल्प असल्याने, हा राज्यासाठी बहुउद्देशीय प्रकल्प ठरला आहे. कोयनेच्या पाण्यामुळे 45 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन हरितक्रांती झाली आहे. या प्रकल्पात दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत असल्याने, राज्यातील बराचसा भाग प्रकाशमान झाला आहे. तांत्रिक अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातसुद्धा कोयना धरणाचा उल्लेख गुणवत्ता आणि दर्जाचे दुसरे प्रतीक, असा होतो. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या प्रकल्पाला बसत आहे.
कोयना धरण प्रकल्पात अभियंत्यांच्या रिक्तपदांचे शतक झाले आहे. उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अशी रिक्तपदांची मोठी यादी आहे. त्यामुळे रिक्तपदांचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या अभियंत्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अलीकडेच कोयनेचे रूपांतर सिंचन विभागात करून, सांगलीपर्यंतच्या सिंचनाची जबाबदारी या प्रकल्पावर सोपवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणाच्या व्यवस्थापनाची जवाबदारीही कोयना प्रकल्पाकडे देण्यात आली आहे. अल्प कर्मचारी वर्ग, अभियंत्यांची अपुरी संख्या यामुळे कोयनेतील अनेक प्रकल्प रखडले आहेत.
कोयना सिंचन विभागातील अत्यंत महत्त्वाचे उपकार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. उपविभागीय अभियंत्यांची सात पदे मंजूर असताना, केवळ तीन उपविभागीय अधिकारी कार्यरत आहेत. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंत्यांच्या 38 मंजूर पदांपैकी 28 कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता कार्यरत आहेत. स्थापत्य अभियंत्यांची 28 पदे मंजूर असून, ही सर्व पदे रिक्त आहेत. प्रकल्पाच्या बांधकाम विभागाची अवस्थासुद्धा नाजूक आहे. बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, श्रेणी-2 अभियंता या 20 मंजूर पदांपैकी 18 पदे रिक्त आहेत. स्थापत्य अभियंत्यांची पाच पदे मंजूर असताना, केवळ तीन अधिकारी कार्यरत आहेत. विद्युत व यांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता या मंजूर 15 पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत.