पुणे – शहरात वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या झाडांच्या संवर्धन तसेच देखभालीसाठी तब्बल 36 लाख रूपयांच्या खर्चाची निविदा महापालिकेच्या उद्यान विभागाने स्थायी समितीत ठेवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निविदेत कोणत्या भागातील आणि किती झाडांची देखभाल करणार याची कोणतीही माहिती या निविदेत देण्यात आली नाही. तसेच या निविदा महापालिकेने मागील आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2023 मध्ये काढल्या असताना; त्या सप्टेंबर 2023 मध्ये मान्यतेसाठी का ठेवण्यात आल्या, याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही.
पुणे शहरामध्ये मेट्रो आणि नदी सुधार प्रकल्पांतर्गत वृक्षरोपण केले जाणार आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने कोठे वृक्षारोपण केले आहे. किती वृक्ष लावले आहेत. याबाबत निविदेमध्ये कुठेच उल्लेख करण्यात आलेला नाही.
महापालिका प्रशासनाने 28 फेब्रुवारी ते 9 मार्चच्या दरम्यान निविदा प्रक्रिया राबविली. यानंतर 10 मार्चला निविदा उघडण्यात आली. यानंतर आता थेट सप्टेंबर महिन्यामध्ये निविदा मान्यतेला आली आहे. त्यामुळे महापालिका उद्यान विभागाकडून इतका उशीर का झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे झाडे कुठे लावली अथवा किती झाडांची देखभाल करणार याचा कुठेच उल्लेख नाही.
नियमानुसार मराठी आणि इंग्रजी अशा दोन वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. असे असताना केवळ एकाच इंग्रजी दैनिकात जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे ही निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.