पुणे(प्रतिनिधी) – लॉकडाउनच्या काळात न्यायालयामध्ये जमा असलेल्या पोटगीच्या रक्कम घेण्यासाठी येऊ न शकलेल्या महिलांना कौटुंबिक न्यायालयाने दिलासा दिला आहे. साठ प्रकरणांमध्ये पोटगीची रक्कम महिला पक्षकारांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी पोटगीच्या या रकमा महिला पक्षकारांच्या खात्यात जमा करण्यात आल्या आहेत.
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर अनेक महिला न्यायालयात जमा असलेली पोटगीची रक्कम घेण्यासाठी येऊ शकल्या नाहीत. त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज आता आठ जूनपासून दोन सत्रामध्ये सुरु होणार आहे. करोनाच्या संसर्गाची भिती असल्यामुळे न्यायालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकारात्मक पद्धतीने कामकाज करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांचे समुपदेशन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशक करणार आहेत. तसेच ज्या प्रकरणांमध्ये पक्षकारांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची तयारी दर्शवली आहे, त्यांचे दावे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे निकाली काढावेत, असे निर्देश प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिले आहेत