- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाजवला “गॅंग’चा “बाजा’
वडगाव मावळ – पैशांसाठी विवाह इच्छुकांना हेरून लग्नाचा खोटा “खेळ’ खेळणाऱ्या 12 महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने “गॅंगलीडर’ आणि त्यांच्या लुटारू टोळीची पोलीस ठाण्यात “वरात’ काढली. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवड गावात फसणुकीचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील दिवड गावातील 32 वर्षीय गणेश सावळे यांची लग्न जुळत नव्हते. हे हेरून या टोळीची मुख्य महिलेने गणेश यांच्या घरी गेली. एक विवाहइच्छुक तरुणी असल्याचे सांगितले. त्यानंतर पुण्यातील कात्रज-धनकवडी परिसरातील 27 वर्षीय एका तरुणी भेट घालून दिली. तिचे नाव आणि पत्ताही खोटे सांगितला. प्रत्यक्षात गणेश सावळे यांच्यासाठी ज्या मुलीशी लग्न लावण्यात आले होते, त्या महिलेला दोन मुले होती.
मुख्य आरोपीसह अन्य 13 जणांनी नाव बदलून 27 वर्षीय महिलेला 21 जानेवारी रोजी बोहल्यावर उभे केले. गणेश आणि महिलेचा आळंदी येथे थाटात विवाह झाला. हे लग्न जुळविण्यासाठी गणेश सावळे याने दोन लाख 40 हजार रुपये दिले. दरम्यान, “डमी’ नववधू ही गणेश सावळे याच्या घरी नांदण्यासाठी आली. मात्र ती तिच्या प्रियकराशी दिवसातून 2 ते 3 तास चर्चा करत असे.
त्यामुळे गणेशच्या घरातील मंडळींना संशय आला. तसेच तिचे लग्न झाले असल्याचेही तिच्या प्रियकराने गणेशच्या नातेवाइकांना कळविले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याने गणेश सावळे व त्याचे कुटुंबातील सदस्यांनी “डमी’ वधूच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले.
सोमवारी (दि. 8) डमी वधूची गणेश यांच्याशी लग्नगाठ बांधणारी महिला पहिल्या बोळवणीसाठी वधूला घेऊन जाण्यासाठी नेण्यास येणार आहे, अशी माहिती गणेशच्या नातेवाइकांना मिळाली आणि जाताना “डमीवधू’ ही घरातील सोने व पैसे चोरून नेणार असल्याचे तिचे फोनवरून झालेल्या चर्चेवरून लक्षात आले. गणेश सावळे व त्याचे घरातील सदस्य “या’ महिलांची वाट पहात होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी चार वाजता महिलांची टोळी गणेशच्या घरी आली. त्या सर्व महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर ही बाब पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांना कळविण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, दत्तात्रय जगताप, एस. के. पठाण, कर्मचारी राजेंद्र थोरात, आर. बी. पुणेकर, एम. जी. अयाचित, एस. जे. चंद्रशेखर, पी. एच. घाडगे, एस. पी. नाईकनवरे, एस. पी. अहिवळे, ए. ए. नवले, एल. पी. जगताप, पी. जी. कांबळे, सोनल धुमाळ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
संशयास्पद हालचालीवरून सर्व महिला, एक मोटार व रिक्षासह 2 पुरूषांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. महिलांकडून मोबाइल फोन, डमीवूधच्या घरातून चोरलेली 20 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून ताब्यात दिले.
…अशी ही बनवाबनवी
एक 35 वर्षीय महिला या टोळीची प्रमुख असून पुणे शहरानजीक वाघोली परिसरात वास्तव्यास आहे. ही टोळी लग्नगाठ जुळून येत नसलेल्या पुरुषांकडून लग्नासाठी दोन-तीन लाख रुपये उकळते. विवाह इच्छुकाचे ओळखीच्या एका महिलेशी विवाह लावून देतात. विवाहानंतर महिला सबंधित व्यक्तीकडे 7 ते 8 दिवस राहिल्यानंतर ठरलेल्या “कटा’प्रमाणे विवाहितेला पहिल्या बोळवणीसाठी माहेरी जाण्यासाठी घेऊन जात होते. त्यानंतर पुन्हा नांदण्यास पाठवित नव्हते. विवाह झालेली महिला ही घरात कोणी नसल्याचे पाहून पैसे व मौल्यवान दागिने घेवून धूम ठोकत होती. बहुतेक ठिकाणी नागरीक बदनामी होऊ नये म्हणून पुढे आले नाहीत.
पोलिसांकडून आवाहन
दरम्यान, मुख्य आरोपी महिला व तिच्याबरोबर असणाऱ्या महिलांनी अनेक तरूणाची फसवणूक केलेली असल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झालेली आहे, अशा तरूणांनी तात्काळ पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वडगाव मावळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.