पिंपरी – सच्चा माणूस म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेले आमदार महेश लांडगे यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विशेष जीव आहे. त्यामुळे राज्यात सत्ता नसली, तरी फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांचे कोणीही बिघडवू शकत नाही, अशी फटकेबाजी विधान परीषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
“फ’ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे “चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्याप्रसंगी आमदार पडळकर बोलत होते. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, विकास डोळस, भाजप सरचिटणीस राजू दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार, अंकुश मळेकर, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, अनिकेत घुले, सनी वाघचौरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, जे गोरगरीब आहेत, ज्यांची समाजात प्रतारणा होते. अशा माणसाच्या पाठीशी महेश लांडगे कायम उभे असतात. अशी त्यांची ख्याती आहे. फडणवीस आणि लांडगे दोघेही भले आणि सच्चे आहेत. म्हणून माझा या दोघांवर विशेष जीव आहे.
म्हणून स्थानिक भागांचा विकास – महेश लांडगे
पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या चिखली सारख्या भागाचा कायापालट आपल्याला गेल्या चार वर्षांत दिसून आला. याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही कुठलेही पद देताना शहराबाहेर जाऊन निर्णय घेत नाही. शहरातच, स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो. त्यामुळे महत्त्वाची पदे देखील त्याच ताकदीच्या माणसाला मिळतात आणि म्हणूनच स्थानिक भागांचा विकास झाल्याचे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी नमूद केले.