पुणे महापालिकेकडून पुन्हा जादा पाणी वापर

जलसंपदा विभागाकडून पालिकेला सूचना

पुणे – महापालिकेने पुढील 75 दिवस दररोज 1,350 एमएलडी पाणी घेतल्यास ते शहराला जुलै अखेरपर्यंत पुरणार आहे. असे असतानाही महापालिकेकडून गेल्या तीन ते चार दिवसांत पुन्हा 1,450 एमएलडी पाणी धरणातून उलचण्यात आले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेस पुन्हा एकदा पाण्याबाबत इशारा देण्यात आला असून पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, आयुक्‍त सौरभ राव यांनीही या बाबींची गंभीर दखल घेतली असून प्रशासन 1,350 एमएलडी पाण्यातच काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उन्हाचा चटका वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच, गेल्या दोन ते तीन दिवसांत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे पालिकेकडून खडकवासला धरणातून मान्य कोट्यापेक्षा दिवसाला 100 ते 150 एमएलडी जादा पाणी उचलले जात आहे. हा पाणी वापर असाच जादा राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा निश्‍चित केलेल्या दिनांकापर्यंत शिल्लक राहणार नाही. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महापालिका आयुक्‍तांना ही जादा पाणी वापराची माहिती देण्यात आली. तसेच, पावसाचा अंदाज आणि पाणीसाठा लक्षात घेता, मंजूर केलेल्या साठ्या एवढेच पाणी वापरण्यात यावे अशा सूचना केल्या. त्याची गंभीर दखल घेत आयुक्‍तांनी तातडीने बैठक घेऊन जादा पाणी उचलल्याची माहिती घेतली. तसेच, पाण्याचे नियोजन पुढील काही महिन्यांसाठी का होईना पण काटेकोरपणे करणे आवश्‍यक असल्याने मंजूर कोट्या व्यतिरिक्‍त जादा पाणी घेतले जाणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.