कराड – लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत आपल्या मातोश्रींच्या निधनास सामोरे गेलेल्या सातारा लोकसभा युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी संपूर्ण सातारा जिल्हा पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सातारा व कराड येथे अनुक्रमे शिवसेना आणि भाजप यांच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.
सातारा येथे शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाटगे, जयवंत शेलार आणि सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना मेळावा पार पडला. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे आभार मानून अत्यंत कमी काळात केलेल्या प्रचार कार्याचे कौतुक त्यांनी केले.
कराड येथे भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनुप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्यांनी प्रचार कार्यात दिलेल्या योगदानाचे चीज माझ्या विजयाने निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला. मतदारसंघात तालुक्यातील प्रमुख गावात जाऊन प्रमुख नेत्यांच्या बरोबरीने, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देण्याचा कार्यक्रम पुढील आठवडाभर करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे शेखर चरेगावकर, अतुल भोसले, महेश शिंदे, मनोज घोरपडे, दीपक पवार, मदनदादा भोसले यांनी प्रचार कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचाराचे शिवधनुष्य लिलया पेलले असल्याचे नरेंद्र पाटील यांनी मत व्यक्त केले.