आळंदी : छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवारीची प्रतिकृती सोबतच लंडनच्या संग्रहालयात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे हुबेहूब रेखाचित्र नारायण मोतीराव यांनी साकारले आहे. या दोन्हींची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झाली आहे. या कार्याची दखल घेत आळंदी येथील इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने चित्रकार नारायण मोतीरावे यांना नुकताच इंद्रायणी कला सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उद्योजक शिरिष कारेकर, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष दादासाहेब कारंडे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, जनार्दन पितळे, यशवंती संस्थेचे अध्यक्ष राजेश दिवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. ही तलवार लंडनच्या संग्रहालयातून आपल्या भूमीत आणण्याच्या चर्चा होतात; पण त्या हवेतच विरतात. ही तलवार येईल तेव्हा येईल पण नारायण मोतीरावे गुणवंत चित्रकाराने या तलवारीची हुबेहुब प्रतिकृती साकरून त्या तलवारीचा इतिहास रयतेच्या मनात ताजा केला आहे, असे संस्थेचे सचिव दिनेश कुऱ्हाडे
यांनी सांगितले.
तलवारीची लांबी 120 सेंटीमीटर
रत्नजडित भवानी तलवारीची प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना 49 दिवसाचा कालावधी लागला आहे. तलवार आणि त्याच्या पात्यासाठी त्यांनी सागाच्या लाकडाचा तसेच ग्रॅनाईट पत्र्याचा आणि मुठीवरील नक्षी कामासाठी मिनाकारी आणि कुंदनचा वापर केला आहे. या तलवारीची लांबी 120 सेंटीमीटर आहे.
‘त्यात’ कागद आणि ब्लेडचा वापर
कागदाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र कोरिव काम करत रेखाकृतीच्या स्वरूपात साकारले आहे. त्यासाठी त्यांनी कागद आणि ब्लेडचा वापर केला. रेखाकृती साकारण्यासाठी त्यांना 26 दिवस लागले. छत्रपतींच्या चित्राचे तसेच तलवारीच्या प्रतिकृतीचे अनावरण संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.