पुणे -शहरात गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपीएल बसमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता पीएमपीएल प्रशासनाने केवळ महिलांकरिता 19 मार्गावर 24 महिला स्पेशल बस (तेजस्विनी) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ महिलांकरिता या बसेस धावणार असून यामध्ये महिला कंडक्टरची नेमणूक केली जाणार आहे.
शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीएलच्या बसेसमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीएलच्या सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक बसेस संचलनामध्ये आहेत. दररोज या बसेसमध्ये मोठी गर्दी असते. विशेषतः सकाळी आठ ते बारा आणि रात्री चार ते आठ या पीक अव्हर्समध्ये हे गर्दीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे बसमधील महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी महिलांसाठी तेजस्विनी बसेस सोडल्या जातात. यानुसार शहरातील 19 मार्गावर 24 बसेसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. मात्र, पिक अव्हर्समध्ये अधिक गर्दी असते. त्यामुळे या कालावधीपुरतेच महिला स्पेशल सोडण्यात येत होत्या. दुपारी बारा ते सायंकाळी पाच या मधल्या काळात या बसेसमधून पुरूषांना देखील प्रवास दिला जात होता. परंतु आता या बसेसमधून केवळ महिलांना प्रवास करता येणार आहे. तसेच सर्व मार्गावरील बसेसमध्ये महिला कंडक्टरची नेमणूक केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
19 मार्गावर 24 महिला स्पेशल बसेस धावणार आहेत. या बसेसमध्ये आता पुरूष प्रवाशांना प्रवेश न देता केवळ महिलांसाठी या बसेस धावतील. यासाठी यात वाहक म्हणून महिला कंडक्टरची नेमणूक करण्यात येणार आहे.
– प्रज्ञा पवार, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल
या मार्गावर धावणार महिला स्पेशल
स्वारगेट ते येवलेवाडी, हडपसर, आप्पा बळवंत चौक ते सांगवी, मनपा ते लोहगाव, कोथरूड ते विश्रांतवाडी, कात्रज ते महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड, हडपसर ते वारजे, भेकराईनगर ते मनपा, हडपसर ते वाघोली, अप्पर डेपो ते स्वारगेट, पुणे स्टेशन, लोहगाव ते पुणे स्टेशन, मनपा ते आकुर्डी, निगडी ते पुणे स्टेशन, भोसरी, हिजंवडी माण फेज तीन, चिंचवडगाव ते भोसरी, चिखली ते डांगे चौक या मार्गावर बस धावणार आहेत.