मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, एक जिल्हा एक उत्पादन योजना ठरु शकतात उपयोगी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या अर्थसंकल्पात उद्योगांच्या दृष्टीने काही चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तरीही उद्योगांसाठी विशिष्ट तरतूद व्हावी, अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून 25 हजार उद्योग घटकांना समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे. याचा उद्योगांना फायदा होऊ शकतो. तसेच एक जिल्हा, एक उत्पादन या योजने अंतर्गत कामगारांच्या कौशल्य विकासात भर पडू शकते.
औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने तीन हजार कोटींहून अधिकची तरतूद केली आहे. ही तरतूद खूपच आवश्यक होती. यावर योग्य अंमलबजावणी झाल्यास सर्वांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरेल.
अर्थसंकल्पामध्ये पुण्यात आणखी एक विमानतळ देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. परंतु उद्योगनगरीतील उद्योजक अजूनही चाकण-खेड या परिसरात विमानतळ व्हावे, यासाठी आग्रही आहेत. या परिसरात विमानतळ झाल्यावरच उद्योगांचा विकास होईल. कौशल्य विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणेचे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने स्वागत केले आहे.
तसेच द्रुतगती मार्गावर इलक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंटचा निर्णय देखील इलक्ट्रिक वाहन निर्मिती आणि विक्रीच्या दृष्टीने चांगला असल्याचे म्हटले आहे. पुणे नाशिक रेल्वेमार्ग आणि शहरातून जात नसला तरी याचा उद्योगनगरीला माल पोहोचविण्यासाठी फायदा होईल, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
संघटनेने म्हटले आहे की, उद्योगांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु करोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता या पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसत आहे.
या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, एक जिल्हा एक उत्पादन योजना, प्रदूषण कमी करण्यासाठी तरतूद, स्किल डेव्हलपमेंट, नवीन विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे अशा घोषणा उद्योगांसाठी उपयोगी ठरतील. उद्योजकांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु उद्योगांप्रमाणे सरकारला देखील करोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे बहुधा त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. उद्योगांना सरकारकडून अजूनही अपेक्षा आहेत.
– संदीप बेलसरे, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना.