नवी दिल्ली – राज्यातील लॉकडाऊन कमी होत असल्यामुळे विविध क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. पायाभूत क्षेत्राची उत्पादकता जुलै महिन्यात तब्बल 9.4 टक्के इतकी नोंदले गेली आहे.
मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता उणे 7.6 टक्के इतकी होती.त्यामुळे ही उत्पादकता जास्त वाढली असल्याचे आता भासत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. जुलै महिन्यामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, खत, पोलाद, सिमेंट. वीज उत्पादन वाढले आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्राचा एकूण औद्योगिक उत्पादनांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाटा असतो. त्यामुळे लवकरच जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी सकारात्मक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढावी यासाठी उत्पादकता आधारित अनुदान जाहीर केले आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारने पायाभूत क्षेत्राची उत्पादकता वाढावी याकरिता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात पायाभूत क्षेत्राची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या अनुत्पादक पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प वापरासाठी खाजगी क्षेत्राकडे देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे.