नवी दिल्ली – केंद्र सरकारने केलेल्या काही उपाययोजनांमुळे देशातील पोलादाचा साठा वाढला आहे. त्यामुळे पोलादाच्या किमती कमी होत आहेत. प्राप्त माहितीनुसार जून महिन्यात पोलादाच्या किमती 14 ते 20 टक्क्यांनी म्हणजे 12 ते 15 हजार रुपयांनी कमी झाल्या असल्याचे सांगितले जाते.
गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये प्रथमच पोलादाच्या किमती इतक्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. याबाबत विश्लेषकांनी सांगितले की एकतर मागणी कमी आहे. त्यामुळे कंपन्याकडे पोलादाचा साठा वाढला आहे. खनिजाची किंमत कमी झाली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातून मागणी कमी झाल्यामुळे पोलादाच्या किमती कमी होत आहेत.
चीनमध्ये करोनामुळे अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये पोलादाचा वापर कमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हॉट रोलच्या किमती 18 टक्क्यांनी कमी होऊन 64 हजार रुपये प्रति टन झाल्या आहेत. अगोदर या किमती 78 हजार रुपये प्रतिटन होत्या.
काही कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांनी सांगितले की काही कंपन्या सध्या सूट देत आहेत. पावसाळ्यामध्ये पोलादाची मागणी कमी असते. त्याचबरोबर देशात पोलादाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे पोलादाच्या किमती सध्या कमी झाल्या आहेत. केंद्राच्या पोलादावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर भारतातील खनिज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पोलादाच्या खनिजाच्या किंमती कमी केल्या आहेत. मात्र वाहन आणि बांधकाम क्षेत्रातील उद्योगांनी या घडामोडी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.