चऱ्होली, दि. 3 – आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या सहयोगातून मंदिराच्या ओवरीत रामनवमीचे औचित्य सधून गडकिल्ले सेवा संस्था चिंचवड, सगरमाथा, मऱ्हाटा पतशहा, दगडांच्या देशा प्रतिष्ठान मुंबई आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान वाघोली या संस्थांच्या प्रयत्नांतून छत्रपती शिवरायांच्या अस्सल 11 चित्रांचे प्रदर्शन ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर प्रांगणात सर्वांसाठी लावण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे, इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, गडकिल्ले सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष घुले, नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, श्रीहरी तापकीर, ऍड. नाजिम शेख, सुमित दाभाडे, पांडुरंग शिंदे, लखन घाडगे, प्रशांत नाईकरे, रविराज फुगे, संदेशकुमार नवले, नीलेश गावडे, जितेंद्र माळी, मोहन कदम उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांबद्दल जनसामान्यांमध्ये विलक्षण कुतुहल आहे. छत्रपती प्रत्यक्षात कसे दिसत असतील, त्यांचा पेहराव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांची आभूषणे, त्यांची नेहमीच्या वापरातील शस्त्रे ही कशी असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकास असते. या चित्रांमध्ये बहुतांशी चित्रे ही छत्रपती दक्षिण दिग्विजयाकरिता गोवळकोंड्याला गेले असता तेथील कलासक कुतुबशहाने देशोविदेशीच्या चित्रकारांकरवी अवर्जून काढून घेतली.
11 चित्रांमध्ये केवळ एकच चित्र भारतात
सदरची चित्रे ही मिनिएचर स्वरूपात असून त्याच चित्रांची एन्लार्ज कॉपी येथे प्रदर्शनात माहितीसह मांडल्या गेल्या होत्या. सदर मूळचित्रे ही नेदरलॅंडच्या अम्स्टरडॅम, पॅरिसच्या राष्ट्रीय संग्राहलयात, जर्मनच्या राष्ट्रीय संग्राहलयात उपलब्ध असून, त्याच चित्रांचे प्रदर्शन येथे भरविले होते. 11 चित्रांमध्ये केवळ एकच चित्र भारतात असून बाकीची सर्व परदेशात आहेत, अशी माहिती इतिहास अभ्यासक ब. हि. चिंचवडे, अनिल दुधाणे आणि संतोष घुले यांनी दिली.