वाल्हे (ता.पुरंदर) येथील मकदमवाडी येथील कोरोनाबाधित व्यक्ती मागील आठवड्यात कोरोना मुक्त होऊन घरी परतला. त्यावेळी वाल्हे गाव कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे परिसरामधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र आज वाल्हे येथील खासगी वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातून वाल्हे गावाचा समावेश पुन्हा कोरोनाबाधितांच्या यादीत झाला आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस वाल्हे गावठाण प्रतिबंधितक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
७ जुलै दरम्यान मुकदमवाडी येथील एक व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ती व्यक्ती कोरोना मुक्त होऊन मागील आठवड्यामध्ये घरी परतली होती. त्यामुळे गावातील बाजारपेठ देखील बऱ्यापैकी खुली झाली होती. मात्र, आज येथे एक खासगी वैद्यकिय व्यावसायिक करणारी डॉक्टर व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षक आदींच्या मदतीने संपूर्ण गावाची तातडीने तपासणी सुरू केल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली.
वाल्हे व परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने तहसीदार रूपाली सरनोबत यांनी तातडीने वाल्हे येथे भेट देऊन संबंधित सर्व यंत्रणेला मार्गदर्शन करून सुचना केल्या. त्यानुसार आजपासून पुढील तीन दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून संपूर्ण गावाची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. तपासणीसाठी येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये, जेष्ठ नागरिक व दहा वर्षाच्या आतील लहाने मुले यांना वैद्यकिय कारणाशिवाय बाहेर पडू देऊ नका असे, आवाहनही तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.
या वेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, सरपंच अमोल खवले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, सचिन लंबाते, तलाठी नीलेश अवसरमोल, पोलिस हवालदार हनुमंत गार्डी, बी. व्ही. जगदाळे, मंगेश घोगरे, आरोग्य सेविका धनश्री राऊत, आनंद पवार,आदि उपस्थित होते.
तोंडाला मास्क न लावणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे व विनाकारण दुचाकीवर दोघे फिरणारे आदींना पाचशे ते हजार रूपये दंड ठोठावणार असून, जर कोणी व्यावसायिकाने दुकान उघडल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले. तसेच, कोरोना प्रतिबंधितक्षेत्र हे ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लॅन्ट शेजारी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वाल्हेकरांनी फिल्टर प्लॅन्टकडे न येता घरी नळाला येणारे पाणी उकळून गार करून प्यावे. बाहेरून आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुऊनच घरात प्रवेश करावा, असे ग्रामपंचायत प्रशासनकडून आवाहन करण्यात आले.
दरम्यान वाल्हे गावठाणामधीलच एका वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वाल्हे येथील गावामध्ये येण्याचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच गावांमधील सर्वच दुकाने बंद राहणार असल्याने परिसरामधील नागरिकांनी कोणीही गावामध्ये येऊ नये असे आवाहन वाल्हे प्राशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.