मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने लॉक डाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या मजुरांना घरी पोहचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. सोनू सूदच्या मदतीमुळे परराज्यात अडकलेल्या नेक मजुरांना आपापल्या इच्छित स्थळी पोहचण्यास मोठी मदत मिळाली होती. सोनू सूदने हाती घेतलेल्या या मोहिमेचे नेटकऱ्यांनी भरभरून स्वागतही केलं होत.
दरम्यान, आता देशव्यापी लॉक डाऊन बऱ्यापैकी शिथिल झाला असून अनेक राज्यांमध्ये जीवन थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर येतंय. मात्र लॉक डाऊनच्या काळात स्वगृही गेलेल्या मजुरांना आता रोजगाराची चिंता सतावू लागली असून शहरामध्ये परतल्यास आपल्याला पुन्हा रोजगार मिळेल का? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. अशातच मजुरांसमोर उभ्या ठाकलेल्या रोजगाराच्या प्रश्नावरही तोडगा काढण्याचा निर्णय अभिनेता सोनू सूद याने घेतला असून यासाठी तो लवकरच एक ऍप लाँच करणार आहे.
— sonu sood (@SonuSood) July 22, 2020
याबाबतची माहिती स्वतः सोनू सूदने ट्विटरद्वारे दिली असून, “आता रोजगार देण्याची वेळ” असा संदेश दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ऍपचे नाव प्रवासी रोजगार ऍप असं असणार असून याद्वारे गरजूंना ५०० हुन अधिक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी खुल्या होणार आहेत. या कंपन्यांमध्ये आरोग्य, बांधकाम, कापड व्यवसाय, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, वाहन उद्योग, ऑनलाईन व्यवसाय, व वाहतूक या संबंधित व्यवसायांचा समावेश असेल. ही सुविधा दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, कोयंबटूर आणि तिरुवनंतपुरम या सात शहरांमध्ये हेल्पलाइनच्या सुविधेसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना सोनू सूदने, “हे ऍप बनवण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहोत. रोजगाराबाबत देशात आधीपासून सुरु असलेल्या कामावरच हे ऍप अवलंबून आहे. दारिद्र्य रेषेखालील तरुणांना रोजगार व प्रशिक्षण देणाऱ्या काही नामांकित संस्थांचा सल्ला घेऊन हा उपक्रम पार पाडण्यात आला आहे.”