पुणे -राज्य शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 22 सप्टेंबर, तर बारावीची 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
इयत्ता दहावी पुरवणीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. तर, बारावीची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालवधीत होणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले.
इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.