पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील दुष्काळसदृश्य भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाविद्यालयांना माहिती सादर करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करुन सवलती लागू करण्याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत लागू केलेली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित दुष्काळसदृश्य तालुक्यातील महाविद्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
परीक्षा शुल्काबाबतची आवश्यक ती कार्यवाही करावी आणि कोणत्याही परिस्थितीत दुष्काळसदृश्य तालुक्यातील पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. संबंधित महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या नमुन्यामध्ये माहिती नोंदवून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
सर्व माहिती भरुन झाल्यानंतर विवरणपत्र व प्रमाणपत्राची प्रिंट आऊट घेवून त्यावर प्राचार्य, संचालक यांची स्वाक्षरी व शिक्का घेवून दोन्ही कागदपत्रे लॉगिनमध्ये अपलोड करावीत. संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी भरलेल्या रक्कमेची प्रतीपूर्ति करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.