नवी दिल्ली- आयपीएल 2023 चा हंगाम जोरदार सुरु आहे पण अशातच संपूर्ण क्रिकेट जगतात एका वाईट बातमीने दुःख पसरले आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. चाहत्यांनी आणि दिग्गजांनी हीथ स्ट्रीक लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. 49 वर्षीय हीथ स्ट्रीकला यकृताचा कर्करोग झाला आहे आणि तो आता चौथ्या टप्प्यात पोहोचला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असून तो सध्या जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकतो-
झिम्बाब्वेचे क्रीडा मंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे ते म्हणाले कि ‘हीथ स्ट्रीक सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. कुटुंब यूकेहून दक्षिण आफ्रिकेत जात आहे. आता केवळ चमत्कारच त्याला वाचवू शकतो. त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.’ असं ते म्हणाले आहेत.
कुटुंबीयांनी दिला विश्वास-
हीथ स्ट्रीक कुटुंबाने त्याच्या प्रकृतीबद्दल गोपनीयता बाळगण्याची विनंती केली आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी म्हटले की, “हीथला कॅन्सर आहे आणि दक्षिण आफ्रिकेतील एक प्रतिष्ठित ऑन्कोलॉजिस्ट त्याच्यावर उपचार करत आहेत. तसेच त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा त्याला यातून नक्कीच बाहेर काढेल. जसा तो मैदानावर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढत होता तसाच आता या आजाराशी देखील लढेल.” असा विश्वास दिला आहे.
आयपीएलमध्ये केले कोचिंग-
हिथ स्ट्रीकने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. तर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध सप्टेंबर 2005 रोजी खेळला होता. हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुमारे 12 वर्षांची आहे. यादरम्यान त्याने झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपदही स्वीकारले होते.
त्याच्या काळात हीथ स्ट्रीक हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही काम केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात लायन्स (GL) यांसारख्या संघांच्या कोचिंग स्टाफचा तो महत्त्वाचा भाग होता. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे.