शशिकांत भालेकर
पारनेर – पारनेर तालुक्यात राजकीय उलथापालथ होऊन कोण कोणत्या पक्षात आहे आणि कोणाचा पाठिंबा कोणाला आहे, हे मतदारांना समजेपर्यंत परिस्थिती बदललेली असते. याचाच प्रत्येक राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी घेतलेली माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट होय. झावरे लंके यांना पाठबळ देणार का, याची चर्चा सध्या सुरू आहे.
तालुक्यात विधानसभा निवडणुकीमुळे अनेक उलथापालथी सध्या पहायला मिळत आहेत. अनेक नेते पुढारी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. शिवसेनेचे विजय औटी व राष्ट्रवादीचे नीलेश लंके या दोघांत सध्या सामना होताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या सभेस पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे हे अनुपस्थित होते. त्याबाबत उलटसुलट चर्चा होत असतानाच लंके यांनी थेट माजी आ. नंदकुमार झावरे यांचे निवासस्थान गाठले. यावेळी त्यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा करून तालुक्यातील विविध प्रश्नांवर विचार मंथन केल्याचे बोलले जात असून, झावरे यांनी लंके यांना निवडणुकीसाठी आशीर्वाद दिले, असे देखील सांगण्यात येत आहे.
त्यामुळे माजी आमदार झावरे यांचा पाठिंबा लंके यांना मिळतो का व ते अधिकृत लंके यांच्या प्रचारामध्ये सहभागी होतात का, हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. परंतु सध्या तरी लंके यांनी झावरे यांची मनधरणी केली असल्याचे बोलले जात असून,ठाकरे यांच्या सभेदरम्यान नंदकुमार झावरेंचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यात माजी आमदार कै. वसंतराव झावरे व बाबासाहेब ठुबे यांचा नामोल्लेख ठाकरे यांनी केला. परंतु माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा नामोल्लेख त्यांनी केला नाही, हे देखील शंकास्पद होते.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात राजकीय उलथापालथ होत असून, राष्ट्रवादीतील नाराज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी भाजपला जवळ केले. भाजपमधील खा. डॉ. सुजय विखे यांच्याशी सलोखा निर्माण केला व त्यांनी औटी यांना पाठिंबा जवळजवळ दिला आहे. त्याचबरोबर कम्युनिस्टचे माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची नाराजी आमदार औटी यांनी दूर करून त्यांना देखील जवळ केले आहे. मात्र अनेक दिवसांपासून त्यांच्यासोबत असणारे पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे व माजी आमदार नंदकुमार झावरे हे मात्र दुरावत गेले का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. राजकीय समीकरणे बदलत असल्याने नागरिकही संभ्रमात आहेत.
तालुक्यात जुळतील नवी समीकरणे?
गेल्या तीन निवडणुकांमध्ये माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा आमदार विजय औटी यांना निवडणुकीमध्ये पाठिंबा होता. त्यांनी वेळोवेळी औटी यांची मदत अडचणीच्या काळामध्ये केली आहे. मात्र यावेळी लंके यांना त्यांचा जर आशीर्वाद मिळाला, तर या मतदारसंघांमध्ये वेगळे चित्र पहावयास मिळू शकते.