सातारा – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि “व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यांची ओळख व्हावी आणि ते हाताळता यावे यासाठी या मशीनचे अंतिम प्रात्यक्षिक विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर आज एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये दाखवण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपजिल्हाधिकारी तथा उपनिवडणूक अधिकारी रूपाली आवळे, तहसीलदार वैशाली राजमाने उपस्थित होत्या. प्रात्यक्षिकावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
“व्हीव्हीपॅट’मुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले, हे मतदान केल्यानंतर काही सेकंद दिसणार आहे. त्यामुळे निवडणुकीविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये कोणतीही शंका राहणार नाही, असे मत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान करुन विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन केले.