कोरेगावला दिलासा; नेते गेले तरी कार्यकर्ते जाणार की नाही हा प्रश्न अधोरेखित
सातारा – सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील सर्वच राजे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नुकत्याच झालेल्या साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान राजे जरी भाजपमध्ये गेले व जात असले तरी सरदार आणि सैन्य राष्ट्रवादीमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या काळात उर्वरित राजे जरी भाजपमध्ये गेले तरी निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या मागे येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुधवारी साताऱ्यात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून प्रथमच साताऱ्यातील राजेंच्या शिवाय पक्षाचा कार्यक्रम उत्फूर्तपणे पार पडल्याचे दिसून आले. त्यामागे कारणे अनेक असल्याचे दिसून आले. शिवस्वराज्य यात्रेचे सारथ्य करीत असलेले खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता पाहता सभेचे आयोजन साताऱ्यातील (सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ क्षेत्र) गांधी मैदानावर करता आले असते.
मात्र, सभेचे आयोजन जाणीवपूर्वक कोरेगाव मतदारसंघातील समाविष्ट औद्योगिक वसाहत परिसरात करण्यात आले. त्यामुळे सातारा तालुक्यात समाविष्ट कोरेगाव व कराड- उत्तर विधानसभा क्षेत्रातील आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थक सभेला उपस्थित राहिले. केवळ उपस्थित राहिले नाही तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सहभागी होताना दिसून येत होते. त्यामुळे कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी असलेले आमदार शशिकांत शिंदे यांचा भार काहीसा हलका झाला होता. मात्र, दुसऱ्या बाजूला भाजपच्या गोटात ही खबर पोहचताच कल्लोळ निर्माण झाला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे साताऱ्यासह कराड उत्तर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर भाजपचे प्रभुत्व वाढले अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, सातारा विधानसभा वगळता दोन्ही मतदारसंघातील प्रमुख, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी अद्याप राष्ट्रवादीतच कार्यरत राहण्याचा निश्चय केल्याचे दिसून येत आहे.
हा निर्णय त्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी विचारूनच घेतला की परस्पर घेतला, याची देखील आता चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील एक माजी अपक्ष ज्येष्ठ नगरसेवकदेखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे येत्या काळात सर्वच राजे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्याच्या अपेक्षेने ते कार्यक्रमाला आली असल्याची देखील चर्चा सभेच्या ठिकाणी होती.