मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही चेकमेट करत भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड जिंकून आले आहेत. दरम्यान, या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना लाड यांनी थेट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये १० जागांसाठी ११ उमेदवार असताना १० व्या जागेवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील एखाद्या पक्षाचा संघर्ष पहायला मिळेल अशी शक्यता होती. मात्र तसे न होता, दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला. भाई जगताप यांच्याआधीच प्रसाद लाड निवडून आल्याने भाजपाच्या पाच उमेदवारांनी पहिल्या नऊ जागांपैकी पाच जागा जिंकल्या. पाचवे उमेदवार असणाऱ्या लाड यांनी विजयानंतर संजय राऊत यांना ‘पोपट’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनाही खोचक सल्ला दिला आहे.
“आजचा निकाल बरंच काही सांगून जाणार आहे. भाजपाला यावेळेस राज्यसभेपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. मला शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षाही जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल,” असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
तसेच “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आता तरी लक्षात येईल की या पोपटाचा गळा दाबला पाहिजे नाहीतर असा घात होतो,” असा खोचक सल्लाही लाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच पुढे बोलताना, “अकेला देवेंद्र क्या कर सकता है विचारणाऱ्यांना देवेंद्रजींची जादू पुन्हा एकदा पहायला मिळाली,” असे म्हणत आपला आनंद साजरा केला.