इस्रोच्या मदतीनेदेखील राहुल नावाचे सॅटेलाईट लॉंच होणार नाही

भाजपकडून कॉंग्रेसवर खोचक टीका

नवी दिल्ली : देशात सध्या राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील दिग्गज नेते मंडळी इथल्या प्रचारात गुंतले आहेत. त्यातच भाजपकडून कॉंग्रेसवर प्रचारादरम्यान टीका करण्यात येत आहे. त्यातच कॉंग्रेसच्या नेतृत्वावरून पक्षावर भाजपने निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाने कॉंग्रेसच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. कॉंग्रेस राहुल गांधी यांना किती वेळा लॉंच करणार आहे. आता राहुल नावाचे सॅटेलाईट लॉंच होणार नाही, कारण इंधनच संपले आहे. आता इस्त्रोने जरी मदत केली, तरीही राहुल नावाचे सॅटेलाईट लॉंच होणार नाही, असा टोला भाजपाने कॉंग्रेसला लगावला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे एकमेकांचे वाभाडे काढण्यात राजकीय आघाडी घेतल्याचे चित्र सध्या राजधानी दिल्ली अनुभवत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्त वाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपा आणि कॉंग्रेसचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून निशाणा साधला. आज आत्मपरिक्षण करण्याची गरज कॉंग्रेसला आहे.

विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसला उभे राहता येत नाही आणि दररोज वर्तमानपत्र वाचले तर राहुल गांधी यांना रिलॉंच करणार, असे वृत्त वाचायला मिळते. कॉंग्रेस किती वेळा हे सॅटेलाईट लॉंच करणार आहे. किती वेळा लॉंच करणार आहे. मी लोकांना सांगतो की, हे राहुल गांधी नावाचे सॅटेलाईट लॉंच होऊच शकत नाही, कारण इंधनच संपले आहे. आता इस्त्रो जरी आली आणि त्यांनी मदत केली तरीही राहुल सॅटेलाईट लॉंच होणार नाही, असे सांगत पात्रा यांनी कॉंग्रेसच्या दु:खावर डागण्या दिल्या आहेत.

कॉंग्रेसमध्ये सक्रिय होण्याआधीपासूनच भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरूवात झाली. सोनिया गांधी यांचा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल गांधी यांची निवड करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या. काही राज्यातील निवडणुका वगळल्या, तर कॉंग्रेसला समाधानकारक यश मिळवता आले नाही. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पदरी पुन्हा अपयश आले आणि राहुल गांधीचे नेतृत्व अपयशी ठरत असल्याची चर्चाही त्यानंतर सुरू झाली. त्यात राहुल गांधी यांनी तडकाफडकी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे आता भाजपच्या या टीकेला कॉंग्रेसकडून कसे उत्तर देण्यात येते हे पाहणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.