मुंबई : राज्यात भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी धमकी देणाऱ्यांना इशारा दिला.
राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचे कारण उघड केले आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे.
दरम्यान आपल्याला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत पोलिसांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.