वायसीएमचा भोंगळ कारभार : मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाचा मृत्यू होऊन तीन दिवस उलटून गेले आहेत. तरीही वायसीएम प्रशासन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देत नसल्याने नातवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे पोलीसही यामध्ये लक्ष घालत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी डेअरी फार्म येथील कर्मचारी किशोर कावळे यांचा 2 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. छातीवर दाब आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच करोनाचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही मृतदेह ताब्यात दिला जात नाही. गेल्या तीन दिवसांपासून मृतदेह डेडहाऊसमध्ये ठेवण्यात आला आहे. कोल्ड रुम महिन्याभरापासून बंद आहे. तीन दिवसांपासून मृतदेह ताब्यात दिला जात नाही. सातत्याने नियम बदलले जात आहेत. कोविडची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र तरीही मृतदेह ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
त्यांचा करोनाचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन केले नाही. करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांचे शवविच्छेदन करावे लागेल. त्यांना घेऊन जायला आमची काही हरकत नाही. मात्र पॉझिटिव्ह असेल तर अडचण निर्माण होतील यासाठी मृतदेह थांबवला आहे.
– डॉ. श्रीकांत शिंदे, इंचार्ज डेडहाऊस, वायसीएम रुग्णालय
त्या रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांचा स्वॅबही घेण्यात आला आहे. स्वॅबचा अहवाल येण्यासाठी वेळ लागत आहे. करोनाचा अहवाल आला नसल्याने पोलीस पंचनामा करत नाहीत. पंचनामा झाला नसल्याने शवविच्छेदन करता येत नाही.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.