दोन महिन्यांनंतर दुकाने उघडूनही तळीरामांची वाईन शॉपकडे पाठ

कोपरगाव  -लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकाने बंद ठेवल्याने अनेक तळीरामांची दारुविना घालमेल झाली. दोन महिने दारूच्या प्रतीक्षेत असलेल्या मद्यप्रेमींसाठी प्रशासनाने दिलासा देत गुरूवारी सकाळी कोपरगावमधील सर्व वाईनशॉप व बिअरबार विक्रीसाठी खुले केले. शहरातील दारूचे दुकाने चालु झाल्यानंतर तळीरामांची मोठी गर्दी होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांसह दुकानदार व नागरीकांना होता, मात्र सकाळी काही वेळासाठी किरकोळ गर्दी झाली. दुपारीनंतर शहरातील सर्वच दुकानावर शुकशुकाट दिसुन आला.

वाईनशॉपवर मद्य खरेदीसाठी गर्दी होणार, कोण कोण रथीमहारथी लाईनमध्ये उभे राहून मद्य खरेदी करणार हे पहाण्यासाठी काही होशी नागरीक कोपरऱ्यात बसुन मजा पहाण्यासाठी आले होते. पण त्यांच्याही आनंदावर विरझण पडले. मद्यविक्री करणाऱ्यांचा संपुर्ण हिरमोड झाला. गर्दी होणार म्हणुन दुकानासमोर योग्य सुरक्षा व्यवस्था केली होती. बॅरीकेटींग करून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. पण काही वेळातच सर्व काही शांत दिसले. गेल्या दोन महिन्याच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर ही तळीरामांनी वाईनशॉपकडे पाठ फिरवल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

काहींनी स्वतः मद्य खरेदी करण्याऐवजी मित्र, नोकरामार्फत खरेदी करण्याचा फंडा वापरला. मोठ्या बाटल्या घेण्याला त्यांनी प्राधान्य दिले. काहींनी हातात दारुची बाटली मिळताच त्या दुकानाचे व बाटलीचे दर्शन घेत ऋण व्यक्त करून आनंदात बाटल्या पिशवीत घातल्या. तळीरामांशी गर्दी न केल्याने शहरात तर्कवितर्क लढवले जात आहे. काहींच्या मते नागरीकांकडे लॉकडाऊनमुळे पैसे नसल्याने दारु दुकानावर गर्दी झाली नसावी तर काहींच्या यापुढे दररोज अपेक्षीत प्रमाणात दारूंची विक्री होणार आहे. केव्हाही गेले तरी मिळणार आहे. मग आजच का खरेदी करावी म्हणून अनेकांनी गर्दीत खरेदी करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा चौकाचौकात रंगली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.