विडंबन : असून अडचण, नसून खोळंबा

दरबार भरला आहे. आज महाराज भलतेच खूश आहेत. या आनंदाच्या क्षणी काही करमणुकीची सोय झाली असती तर बहार आली असती, असा विचार करून महाराजांचा मुड पुन्हा जातो. ही घालमेल चाणाक्ष प्रधानजी टिपतात व परिस्थिती हाताळायला पुढे सरसावतात.
“महाराज, आपण अगदी त्या राजासारखे आहात’.

“कोणता राजा, प्रधानजी?
“तोच, ज्याला वरदान मिळालेले असते की, ज्या वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू सोन्याची होईल.’
“काहीतरीच प्रधानजी, तुम्ही प्रधानजी आहात, खुशमस्करे नाही!’

“खरंच महाराज’.
“अहो, खरं काय? युवराजांनी “नाइटलाइफ’ची घोषणा केली अन्‌ प्रजेचे दिवसापण बाहेर पडणे मुश्‍कील झाले या करोनामुळे, …म्हणे सोन्याची वस्तू होते’.

“महाराज, चिडू नका. असे पाहा, परप्रांतीयांचा मुद्दा निकाली निघाला की नाही आपोआप. आता आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळणार. मराठी तरुणांना रोजगार मिळणार. आपला विजय आहे हा.’
“खरंच प्रधानजी! आमच्या लक्षात आले नाही हे. कुठलीही बळजबरी न करता हा विजय विलक्षण आहे हं!’

“…तर महाराज, परप्रांतीय स्वगृही गेल्याने आपल्या राज्याची बेरोजगारी कमी होणार, आपण पुन्हा नंबर वन होणार.’

“प्रधानजी, खरंच कौतुकास्पद आहे हे, आपले स्वप्न होते ते. आपले युवक कामधंद्याला लागणार पाणीपुरी विकणार, टाइल्स फिटिंग, वायरमन,प्लंबिंगची कामे करणार. राज्य सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार. अभिनंदन प्रधानजी.’

“होय महाराज, नाहीतर आजवर आपली मुलं पदवीधर झाली की नोकरी मिळत नाही म्हणून कुठल्यातरी लोकल नेत्यांच्या मागेपुढे करण्यात वेळ दवडत होते, तेवढाच चहा पाण्याचा खर्च निघून जात असे म्हणून!’

महाराज विचारात पडतात व चिंतातूर स्वरात “पण प्रधानजी, अहो असे होणे आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे ना!’

“कसे काय महाराज?’
“अहो, आजवर आपल्याला कार्यकर्त्यांची कमतरता भासत नव्हती. सदैव महालावर गर्दी. सभांना गर्दी, आपल्याला शक्‍तिप्रदर्शन करणे किती सोपे जाई, पण आता सर्वांना कामधंदा मिळाला तर आपले काय? कार्यकर्ते कुठं मिळणार?’

प्रधानजी पण चिंतातूर होतात “खरंच! ही बाजू लक्षातच आली नाही महाराज. आता कसे?’
“हूं! स्वगृही गेलेले पुन्हा कसे येतील ते बघा. कारखाने सुरू झाले की सन्मानाने बोलवा त्यांना. आपला मुद्दा पण सुरू ठेवता येईल. काय?’

प्रधानजी मान डोलवत “होय महाराज, जशी आपली आज्ञा. आपल्या सूचना कळवतो.’
महाराज प्रसन्न होतात व आनंदाने गळ्यातील कंठा काढून प्रधानजींकडे भिरकावतात व तखलिया… असे ओरडत दरबार संपल्याची घोषणा करतात.

– धनंजय एकबोटे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.