नोंद : खिलाफत चळवळीची शताब्दी!

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला टिपेला चढलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 1920चे असहकार आंदोलन, 1930ची सविनय कायदेभंगाची चळवळ व 1942 साली झालेले चलेजाव आंदोलन, हे तीन मैलाचे दगड समजले जातात. यातही 1920 च्या चळवळीचे आगळेवेगळे महत्त्व असे की या लढ्याद्वारे गांधीजींचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर गेले. यात त्याच सुमारास सुरू झालेल्या खिलाफत चळवळीचा मोठा हातभार लागला होता. 

या चळवळीला काही अभ्यासक “भारतीय मुस्लिमांची चळवळ’ असेही म्हणतात. याचे साधे कारण असे की, इंग्रज सरकारने बरखास्त केलेल्या तुर्कस्थानातील खिलाफतीच्या विरोधात फक्‍त भारतीय मुस्लिमांनी चळवळ सुरू केली होती. आपल्या देशात ही चळवळ शौकत अली, मोहम्मद अली जौहर (अली बंधू), मौलाना अबुल कलाम आझाद यांनी चालवली होती. 1918 साली संपलेल्या पहिल्या महायुद्धाने जगातील तीन साम्राज्ये संपवली होती. युरोपातील ऑस्ट्रो हंगेरीयन साम्राज्य, झारचे रशियातील साम्राज्य आणि युरोप-आशियाच्या सीमेवरचे ओटोमान साम्राज्य. ओटोमान साम्राज्य म्हणजे सुन्नी मुस्लिमांचे साम्राज्य.

जगभर पसरलेल्या सुन्नी धर्मीयांचा धार्मिक नेता म्हणजे तुर्कस्थानातील खलिफा. ही गादीच इंग्रजांनी बरखास्त केल्यामुळे भारतीय मुस्लीम बिथरले व त्यांनी खिलाफत पुन्हा प्रस्थापित करावी यासाठी 15 मे 1920 रोजी भारतात आंदोलन सुरू केले. भारतीय मुस्लिमांच्या दुर्दैवाने तुर्कस्थानात नंतर केमाल पाशाने क्रांती करून सत्ता हातात घेतली. केमाल पाशाने तुर्कस्थानला आधुनिक करण्याचा विडा उचलला होता. याचाच एक भाग म्हणून त्याने 1924 साली “खिलाफत’ बरखास्त केली. परिणामी भारतीय मुस्लिमांच्या आंदोलनाचा कणाच मोडला. असे असले तरी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आजही या चळवळीचा अभ्यास करतात. या चळवळीच्या निमित्ताने हिंदू-मुसलमान प्रश्‍नांचा अभ्यासही करावा लागतो.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा युरोपियन देशांत तीव्र सत्तास्पर्धा सुरू झाली तेव्हा तुर्कस्थानचे खलिफा सुलतान अब्दुल हमीद (दुसरा) यांनी जगातले एकमेव मुस्लीम साम्राज्य वाचवण्यासाठी अनेक देशातल्या मुस्लिमांना मदतीचे आवाहन केले. त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी त्यांचा दूत जमालुद्दीन अफगाणला भारतातील मुस्लिमांच्या भेटीला पाठवले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात 1857च्या युद्धाने झाली असे समजले जाते. यात मुस्लीम राजेमहाराजे व हिंदूराजे खांद्याला खांद्या लावून लढले. हे बंड अयशस्वी झाले पण भारतीय समाजात जी स्वातंत्र्याची ज्योत पेटली ती विझली नाही. स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक करायचा असेल तर सुमारे 33 टक्‍के लोकसंख्या असलेल्या भारतीय मुस्लीम समाजाचे सहकार्य घेतल्याशिवाय यश मिळणार नाही याची जाणीव झालेला पहिला राष्ट्रीय नेता म्हणजे लोकमान्य टिळक! त्यांनी पुढाकार घेऊन लखनौ येथे 1916 साली मुसलमानांशी करार केला व त्यांना राष्ट्रीय लढ्यात सहभागी केले. या करारानुसार मुस्लिमांसाठी अनेक प्रांतात प्रतिनिधित्वाची टक्‍केवारी पक्‍की करण्यात आली होती. उदाहरणार्थ, मुस्लीम समाजाला पंजाब प्रांतात 50 टक्‍के, बंगाल प्रांतात 40 टक्‍के तर संयुक्‍त प्रांतात 30 टक्‍के जागा प्रदान करण्यात आल्या होत्या.

स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचा सहभाग असावा याची जाणीव झालेला दुसरा नेता म्हणजे महात्मा गांधी. त्यांनी मे 1920 मध्ये सुरू झालेल्या खिलाफत चळवळीला स्वातंत्र्यलढ्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच हेतूने स्थापन झालेल्या खिलाफत कमिटीचे अध्यक्षपद महात्मा गांधींना ऑक्‍टोबर 1919 मध्ये दिले.

तसे पाहिले तर खिलाफत चळवळ म. गांधींच्या असहकाराच्या चळवळीच्या बरेच आधी सुरू झाली होती. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस तुर्कस्थान दोस्त राष्ट्रांच्या विरोधात उभा राहिला व जर्मनीला जाऊन मिळाला. यामुळे भारतीय मुस्लीम अडचणीत आले. ही बदललेली स्थिती लक्षात घेऊन इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड जॉर्ज यांनी जाहीर आश्‍वासन दिले की आम्ही युद्धानंतर तुर्कस्थानशी वैरभावाने वागणार नाही. अशा आश्‍वासनांची फारशी किंमत नसते, याचा प्रत्यय भारतीय मुस्लिमांना महायुद्ध संपल्यानंतर लगेचच आला. युद्धोत्तर करारानुसार तुर्कस्थानचे तुकडे झाले व खलिफाच्या अधिकारांवरही बंधने लादण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या भारतीय मुस्लिमांनी 1919 साली वर्षभर आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाचा फारसा प्रभाव पडला नाही.

गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या असहकाराच्या आंदोलनाला सुरुवातीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अनेक नामवंतांनी वकिली सोडली, शाळा/कॉलेजवर बहिष्कार टाकला. नंतर मात्र मुस्लीम समाजाचा पाठिंबा तीन केंद्रात विभागला गेला. एक, असहकाराची चळवळ; दोन, फक्‍त खिलाफत चळवळीला पाठिंबा व तीन, 1906 साली स्थापन झालेल्या मुस्लीम लीगला पाठिंबा. ही ती तीन केंद्रे होती. पुढे याच दिशेने मुस्लीम समाज विभागला गेला. डॉ. अन्सारी, मौलाना आझाद वगैरे नेते कॉंग्रेसमध्ये राहिले तर अलीबंधू मुस्लीम लीगमध्ये गेले. 5 फेब्रुवारी 1922 रोजी गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा गावात घडलेल्या घटनेने व्यथित होऊन गांधीजींनी चळवळ मागे घेतली.

खिलाफत चळवळ भारतात 1920 साली मे महिन्यात सुरू झाली होती. आता या चळवळीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या चळवळीची पूर्वपीठिका, चळवळीचे स्वरूप व त्याचे परिणाम वगैरेंची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे.

– प्रा. अविनाश कोल्हे

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.