-->

म्यानमारमधील संसदेने निर्बंध केले अधिक कडक

यान्गोन – म्यानमारमधील आंदोलकांवर अधिक बळाचा वापर केला जाईल, असा इशारा संसदेने दिला आहे. मात्र या इशाऱ्याला न जुमानता आंदोलकांनी आज मोठ्या संख्येने बाहेर पडून लष्करी बंडाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांच्या वाटेत अडथळे टाकलेले असतानाही आंदोलकांनी अमेरिकेच्या दूतावासाबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली.

लष्करी शासनाने आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करण्यासाठी लष्कराच्या 20 चिलखती वाहनांमधून सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि दंगलविरोधी पोलीस पथक आणून ठेवले होते. त्यामुळे कोणताही संघर्ष टाळण्यासाठी सर्व आंदोलक शांततेने निघून गेले. यान्गोन शहरातील अन्य भागात मात्र निदर्शने सुरूच होती.

लष्करी बंडाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोमवारी देशभरात कारखाने, कार्यस्थळे आणि दुकाने बंद ठेवण्यात आली. देशव्यापी संपाला संसदेने विरोध केला होता. रविवारी रात्री सरकारी वृत्तवाहिनीवरून या संपाविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

पोलिसांच्या गोळीबारात निरपराध युवती आणि एक लहान मुलगा मरण पावल्यानंतर या आंदोलनात सर्वसामान्यांचा मोठा सहभाग दिसायला लागला आहे. मात्र आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार गुन्हेगारांनी घडवून आणल्यानेच सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागल्याचे संसदेने म्हटले आहे. आजच्या देशव्यापी संपामध्ये सहभागी न होण्याचा इशारा सरकारी वृत्तवाहिनीवरून दिला जात होता. तसेच रविवारी रात्री ट्रकवरून लाऊड स्पीकरद्वारेही तसाच इशारा देण्यात येत होता.

5 वेळा 2 आकड्यांचे निषेधाचे तंत्र
आजच्या दिवशी देशातील सर्व जनतेने लष्करी शासनाविरोधात एकत्र यावे यासाठी आंदोलकांनी “5 वेळा 2′ हा विशेष शब्दप्रयोग केला. आज आंदोलन केले तर देशात पुढच्यावर्षी याच दिवसापर्यंत म्हणजे 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत लोकशाही पुन्हा स्थापित होईल. म्हणून 22-2 (फेब्रुवारी) 22 हे आकडे नागरिकांनी लक्षात ठेवावेत असे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून केले गेले होते. शनिवारी आंदोलनाला अधिक औपचारिकता देण्यासाठी आणि दोन डझनहून अधिक गटांनी एका कमिटीची स्थापना केली. त्या कमिटीने हे देशव्यापी संपाचे आवाहन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.