देऊळगावराजे – देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सामान्य गोरगरीब नागरिकांसाठी ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया सर्दी, खोकला आदी रुग्णांवर मोफत, चांगल्या प्रकारचे उपचार होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर मातांवरही मोठ्या प्रमाणात औषध उपचार होत आहेत. मागील महिन्यामध्ये 15 प्रसूती झाली आहे.
शनिवारी रविवारी सुट्टीचा दिवस असून सुद्धा केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अविनाश अलवार आणि इतर अधिकारी रुग्णांवर उपचार करीत आहेत. सध्या वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे सर्दी, ताप, थंडी, खोकला, डेंग्यू, ताप मलेरिया, टायफॉइड आदी आजार मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे. यावर रुग्णालयात रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
वैद्यकीय अधिकारी अविनाश अलमवार हे रुग्णालयात मुक्कामी राहत असल्यामुळे ते रुग्णांवर रात्रंदिवस उपचार करीत आहेत त्यामुळे त्यांचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पाच उपकेंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दौंड तालुक्यासह कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील रुग्ण आरोग्य केंद्रामध्ये सध्या उपचार घेत आहेत.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येथे दोन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती असून सुद्धा मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी काम करीत आहे. सध्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे. याकडे पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांनी याकडे लक्ष देऊन लवकरच दुसरे वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी, अशी मागणी पुढे आले आहे.
“देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी पत्रव्यवहार देऊळगावराजे ग्रामपंचायतीकडून करण्यात आला.” – स्वाती गिरमकर, सरपंच, देऊळगावराजे.