सातारा – महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हयातील एकूण 65 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हयातील एकूण 65 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेला होता. तद्नंतर त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (स्मार्ट पी एच सी) उपक्रमांतर्गत अद्यावत वैद्यकिय साहित्य, प्रा आ केंद्रामधील अंतर बाहय विभाग, प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह हे प्रमुख विभाग असून हे सर्व विभाग अद्ययावत तांत्रिक संसाधनांनी सुसज्य ठेवण्यासाठी अद्ययावत साधन सामुग्री खरेदीबाबत सूचना देण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञान वापर रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे, लोकांना स्मार्ट हेल्थ कार्ड उपलब्ध करुन देणे, रुग्णांना त्यांच्या तपासणीचे अहवाल मोबाईलवर उपलब्ध करुन देणे, तसेच रुग्ण पुढील उपचारा करीता इतर शासकीय संस्थेकडे संदर्भीत केल्यास रुग्णांची या पुर्वीचा उपचार इतिहास त्या संस्थेकडे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणे करीता अद्ययावत संगणकीय प्रणाली विकसित करुन घेण्यात यावी.
प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम व परिसर सुशोभिकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाह्य परिसरामध्ये प्रामुख्याने सरंक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, हिरकणी कक्ष, प्रसाधन गृह, निवासस्थाने इ. बाबींचा तर अंतर्गत भागामध्ये प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, औषध भांडार, शस्त्रक्रियागृह व संगणक कक्ष इ. बाबी प्रामुख्याने अद्ययावत करणेबाबत सूचना देणेत आल्या. उपरोक्त सर्व बाबी सुस्थीतीत असणे व आवश्यक्ते नुसार दुरुस्ती करणे, सुशोभिकरण करणे, स्वच्छता, इ. बाबींवर प्रामुख्याने विशेष लक्ष देणेबाबत सूचना देणेत आल्या. प्रा आ केंद्रांची स्वतंत्र स्वागत कमान करणे व प्राआकेंद्र दर्शनी भागात आयुष गार्डन साठी CSR मधून निधी उपलब्ध करुन घेणेसाठी प्रयत्न करावेत.
रुग्णांना देण्यात येणा-या सेवांचा दर्जा उंचावणार
” सातारा जिल्हयातील ग्रामीण भागातील लाभार्थीना उच्चप्रतिची आरोग्य सेवा देणे करीता जिल्हयातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोलर सिस्टीम, रेन वॉटर हारवेस्टींग, स्वागत कमान, अद्ययावत यंत्रसामुग्री, संगणकीरण, आयुष गार्डन, सुसज्ज फर्निचरयुक्त कक्ष, अद्ययावत वॉर्ड, इ. सोईसुविधा उपलब्ध करणेत येणार असून त्याव्दारे जिल्हयातील रुग्णांना देण्यात येणा-या सेवांचा दर्जा उंचावणार व शासकीय सेवांबाबत ग्रामीण लाभार्थीमध्ये विश्वास निर्माण करणार.”
जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा