पुणे-डेंग्यू, चिकनगुनिया यासह करोना आणि स्वाइन फ्लू या आजारांनी शहराला विळखा घातलेला असताना आता “झिका विषाणू’चा रुग्ण शहरात सापडला आहे. तसेच “गोवर’ देखील शहराच्या उंबरठ्यावर आहे, सततच्या बदलत्या वातावरणामुळे “व्हायरल इन्फेक्शन’ने डोकेदुखी वाढली आहे, त्यामुळे सावधान…! “परिसर स्वच्छ तर आरोग्य चांगले.’ या आजारांचा विळखा तोडण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेकडून केले जात असताना आरोग्य विभाग काय करते? औषध फवारणी कधी केली? सर्वेक्षण कुठे झाले? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जनजागृतीच्या दृष्टीने पथके कुठेत? पुरेशी औषधे आहेत तर काही दवाखान्यात रुग्णांना औषधांचा हेलपाटे मारावे लागत आहेत.
शहरातील करोना बाधितांची संख्या घटली. मात्र, अजूनही सावट कायम आहे, त्याचबरोबर स्वाइन फ्लूचे रुग्णही सापडू लागले आहेत. मागील सहा महिन्यांपासून डेंग्युने शहरात थैमान घातले आहे. “गोवर आजारा’चे रुग्ण वाढत आहे. तर, बावधनमध्ये “झिका विषाणू’चा रूग्ण सापडला आहे. अधीच बदलत्या हवामानामुळे मच्छरांची पैदास वाढल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण “व्हायरल इन्फेक्शन’न हैराण झाले आहेत. सर्दी, ताप, खोकला झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत, बालकांचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी एकापाठोपाठ एक आजार डोकेवर काढत असल्यामुळे महापालिकेला उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे.
डेंग्यू, चिकनगुनियासाठी अशी घ्या काळजी
अस्वच्छता, मोकळ्या जागेत पाण्याच्या साठ्यांमध्ये डासांची पैदास होते, यातून डेंग्युचे रुग्ण झपाट्याने वाढतात. नागरिकांनी घर, परिसरातील पाण्याचे साठे कोरडे करावेत.
गोवरसाठी अशी घ्या खबरदारी
9 महिने ते 12 महिने या कालावधीमध्ये गोवर व रूबेला लसीचा पहिला तर 16 महिने ते 24 महिने या कालावधीत लसीचा दुसरा डोस घ्यावा. 5 वर्षापर्यंतच्या मुलांना गोवरची लागण होण्याचा धोका अधिक आहे. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, चेहऱ्यावर, शरीरावर पुरळ अशी लक्षणे दिसताच तत्काळ उपचार सुरू करावेत. लसीकरणातून आजारावर नियंत्रण ठेवू शकतो.