पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र, व्यवस्थापन, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक सुरक्षा, सामाजिकशास्त्र या विभागातील पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने प्रसिद्ध केले आहे. त्यात अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा आहे.
या अभ्यासक्रमांमध्ये दोन वर्षांच्या पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसोबतच पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील अनेक अभ्यासक्रम विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागातील आहे. विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहे.