कोपरगाव – दुग्ध व्यवसाय वाढीसाठी चांगल्या दर्जाच्या कृत्रिम रेतन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करुन पशुधन वाढविणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने कोपरगाव व राहाता तालुक्यांतील पशुसंवर्धन विभागाचे शासकीय, निमशासकीय अधिकारी, खासगी क्षेत्रात काम करणारे पशुवैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचारी यांच्यासाठी संघाच्या कार्यस्थळावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी परजणे मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय थोरे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. राहुल त्रिपाठी, राहुरीचे डॉ. एस. आर. पाटील, डॉ. नीलेश लगड, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर, कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, एस. एम. काटे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. राहुल त्रिपाठी यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
परजणे म्हणाले, कृत्रिम रेतन हे कमी वेळात आणि अत्यंत किफायतशीर पध्दतीचे असून, दुग्ध व्यवसाय वाढीसाठी ते एक वरदान आहे. कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरुन अधिक दूध देणाऱ्या नवीन गायी-म्हसींची पैदास करता येते. भविष्यात होणाऱ्या आजारांपासून जनावरांचा बचाव आपण करु शकतो. परजणे यांनी गर्भ प्रत्यारोपणाचाही एक लक्षवेधी उपक्रम राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि गोदावरीच्या संयुक्त सहकार्याने राबविण्याचा मानस असल्याचेही सांगितले. यावेळी डॉ. सुनील तुंबारे, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अजय थोरे, डॉ. नीलेश लगड, डॉ. दिलीप दहे यांनीही मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाच्या सिमेन स्टेशनकडून रेतन कांड्या माफक दरात मिळाल्यास त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता येईल, अशी उपस्थितांनी मागणी केली.