यात्रेसाठीचे १६ लाख शाळा इमारतीसाठी

हिवरे कुंभारमध्ये शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन : राऊंड टेबल इंडिया ट्रस्टची भरीव मदत

विशाल वर्पे

केंदूर – हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होती. मात्र, गाव करील ते राव काय करणार, या म्हणीची प्रचिती गावकऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिली. ज्ञानमंदिराची केविलवाणी अवस्था पाहून गावकऱ्यांनी कंबर कसली. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन यात्रेसाठी लोकवर्गणीतून जमा केलेले तब्बल 16 लाख रुपयांचा निधी शाळेच्या इमारतीसाठी दिला आहे.

शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. जिल्हा परिषदेच्या तुटपुंच्या निधीमुळे शाळेची इमारत पूर्ण होत नाही. विद्यार्थी जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये शिक्षणाचे धडे देत असताना इमारत कधीही दगा देऊ शकते, अशी भीती शिक्षकच व्यक्‍त करीत आहेत. दरम्यान, यावर्षी पाऊस जादा झाल्याने काही गावच्या इमारती शेवटच्या घटका मोजत आहेत. पावसाच्या दिवसांत शिक्षकांनी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये त्याचबरोबर शाळेच्या स्वयंपाक खोलीत बसवून अभ्यासक्रम सुरू ठेवला होता.

काही गावांमध्ये धार्मिक मंदिरे उभारणीसाठी गावपुढाऱ्यांची रस्सीखेच दिसत आहे. मात्र अशा ज्ञानमंदिरांकडे प्रशासन पाठ फिरवत आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता हिवरे कुंभार गावाने आदर्श घालून देत ग्रामस्थांच्या सहभागातून आणि राऊंड टेबल इंडिया ट्रस्टच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेची इमारतीचे जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले आहे. इमारतीसाठी एकूण खर्च अंदाजे 55 ते 60 लाख रुपये इतका लागणार आहे ग्रामस्थांच्या सहभागातून सोळा लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे उर्वरित संपूर्ण खर्चाची जबाबदारी राऊंड टेबल इंडिया ट्रस्ट घेत आहेत.

बकरी चराईचे उत्पन्न जमा – गावातील ग्रामस्थांच्या सहभागातून आणि राऊंड टेबल इंडिया ट्रस्टच्या सहकार्याने शाळेची इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी यात्रेसाठी जमा केलेली वर्गणीतून तमाशा, आर्केस्ट्रा, कुस्त्यांचा आखाडा असे खर्चिक कार्यक्रम रद्द करून जमा झालेली वर्गणी शाळेच्या इमारतीसाठी वापरण्यासाठी संमती दर्शविली आहे. ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच राजाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावून जमा झालेली वर्गानी शाळेच्या इमारतीसाठी वापरण्याचा ठराव एकमुखाने घेण्यात आला.

गावच्या गायरानध्ये बकरी चराईचे पाच वर्षांचे उत्पन्न देखील ज्ञानमंदिराच्या उभारणीसाठी खर्च करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. शिरूर तालुक्‍यात एकीकडे कोट्यवधी रुपयांची धार्मिक मंदिरे उभारली जात आहेत. मात्र, हिवरे कुंभार गावच्या प्रत्येक नागरिकाने ज्ञान मंदिर उभारणीसाठी जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे हिवरे कुंभार गावाने इतर गावांसाठी नक्‍कीच आदर्श घालून दिला असल्याचे बोलले जात आहे.

दुमजली प्रशस्त शाळा – 
शाळेची इमारत दोन मजली होणार आहे. त्यामध्ये एकूण आठ वर्ग खोल्या असतील. त्यामध्ये उद्योजक अतुल खंडेरिया यांनी आपल्या आईचे वय वर्षे 100 पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण एका वर्ग खोलीची जबाबदारी घेतली आहे. इमारतीचे भूमिपूजन करून कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी सरपंच राजाराम दत्तात्रय गायकवाड, पत्नी लीना गायकवाड यांनी राऊंड टेबल इंडिया ट्रस्टकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने हे कार्य आमच्या ट्रस्टने हाती घेतल्याचे ट्रस्टचे चेअरमन कपिल शहा यांनी सांगितले.

दरम्यान, गावकऱ्यांनी दाम्पत्याचा गावच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, अतुल खंडेरिया, सुनील धर्मानी, नुपूर हटकर, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, सुभाष उमाप, सरपंच विकास शिर्के, राहुल टाकळकर, अमोल जगताप, ललिता जगताप, विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)