नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. रविवारी मुख्यमंत्री चौहान हे एका राजकीय सभेला संबोधित करण्यासाठी मनावरहून धार येथे जात होते.
मनावर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग केल्याने थोडक्यात मोठा अनर्थ टाळला असल्याचे म्हटले जात आहे.
तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर जेथून उड्डाण केले होते, तिथेच पुन्हा आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रस्ते मार्गाने धारच्या दिशेने रवाना झाले.
शिवराज सिंह चौहान ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ते हेलिकॉप्टर खासगी कंपनीचे होते. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या धार येथे पाच राजकीय सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठीच ते त्याठिकाणी येणार होते मात्र वाटेतच हा अपघात घडला.