India Embassy in Afghanistan closed : अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे. भारत सरकारकडून आणि मुत्सद्द्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे अफगाणिस्तानच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे.
इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने आजपासून भारतातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निवेदनात दूतावासाने, ‘नवी दिल्लीतल्या अफगाणिस्तानच्या दूतावासाने आजपासून भारतातले आमचं कामकाज बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना आम्हाला खूप निराशा, दुःख आणि खेद वाटतोय,’ असे म्हटले आहे.
खरंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतरही तिथल्या आधीच्या सरकारचा भारतातील दूतावास सुरू होता. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतातला त्यांचा अधिकृत राजदूत कोण यावरून अलिकडेच मोठा गदारोळ झाला होता. अशातच आता अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद केला आहे. यजमान सरकारकडून आम्हाला पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये, त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या हितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यजमान सरकारला अपयश आले असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.
अफगाणिस्तानने निवेदनात,”भारताबरोबरचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील वेगवेगळ्या भागीदाऱ्या पाहता हा निर्णय क्लेशदायक असला तरी आम्ही तो खूप काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे. एकीकडे भारताकडून आम्हाला पुरेसं समर्थन मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला काबूलमध्ये वैध सरकारही नाही. त्यामुळेच आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत.” असे म्हटले आहे.
दरम्यान, दूतावास स्थलांतरित होईपर्यंत दूतावासाच्या भारतातील वाणिज्य सेवा सुरू राहतील असेही दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अफगाणिस्तानी दूतावासातील राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिकेत आश्रय घेतला आहे. पाच अधिकाऱ्यांनी नुकताच देश सोडला. तसेच नवी दिल्लीतले कामकाज थांबवण्याबद्दल दूतावासाने आधीच भारत सरकारला कळवले होते.