सुधारित वेळापत्रक जाहीर : 26 जुलैपासून अर्ज भरण्यासाठी सुविधा
पुणे – लॉकडाऊनचा फटका पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेलाही बसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करावा लागला असून आता सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर अर्जासाठी 26 जुलैपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांत अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा यंदाही अवलंब केला आहे. संभाव्य वेळापत्रक 1 जुलै रोजी जाहीर झाले. त्यानुसार महाविद्यालयांची ऑनलाइन नोंदणी सुरू होती. विद्यार्थ्यांना 15 जुलैपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते; मात्र, ते फिस्कटले.
माध्यमिक शाळा, विद्यार्थी, मार्गदर्शन केंद्र यांना सविस्तर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येऊ नयेत. आवश्यक कागदपत्रे मिळविता यावीत यासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी घेतला. त्यानुसार सुधारित वेळापत्रक जाहीर केले. याबाबतची माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली.
अर्जाच्या सरावासाठी सुविधा
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये. चुका होऊ नयेत. अर्ज भरण्याचा सराव करता यावा म्हणून संकेतस्थळावर 16 ते 24 जुलैपर्यंत तात्पुरत्या प्रारूप लॉगीनची सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात होण्यापूर्वी ही भरलेली माहिती नष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच मूळ संकेतस्थळावर नव्याने अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.