नवी दिल्ली -देशात शुक्रवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 11 हजार 458 नवे करोनाबाधित आढळले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची नोंद होण्याचा तो देशातील नवा उच्चांक ठरला.
करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशाने 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. करोनाबाधित संख्येबाबत 2 लाखांपासून 3 लाखांची मजल मारण्यास देशाला केवळ 10 दिवसांचा कालावधी लागला. बाधितांची संख्या 100 वरून 1 लाखवर जाण्यास 64 दिवस लागले. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांत देशातील बाधितांची संख्या 2 लाखांवर पोहचली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वेगाने पडणारी भर देशासाठी चिंताजनक ठरत आहे. संबंधित 24 तासांत देशभरात आणखी 386 बाधित दगावले. त्यामुळे करोना संसर्गाने आतापर्यंत देशात घेतलेल्या बळींची संख्या 9 हजारांच्या घरात पोहचली आहे.
एकीकडे बाधितांमध्ये भर पडत असली तरी दुसरीकडे बरे होणाऱ्यांची वाढती संख्या आशादायी ठरत आहे. देशातील सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण तीन दिवसांपासून वाढले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 1 लाख 45 हजार 779 सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 54 हजारांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत देशातील जवळपास निम्मे बाधित (49.90 टक्के) पूर्ण बरे झाले आहेत.