बेंगलोर: बेंगळूर शहरातील रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या हॉस्पिटलमध्ये जन्म घेतलेल्या नवजात अर्भकाने अतिशय दुर्मिळ अशा आजारावर मात केली आहे. या अर्भकाचा जन्म झाला तेव्हा त्याचे हृदयही चालू नव्हते तो श्वास घेत नव्हता आणि तो रडतही नव्हता. जन्मानंतर 11 मिनिटे त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. या रुग्णालयातील डॉक्टरनी हार न मानता त्याच्यावर उपचार केले आणि कुलिंग थेरपीचा वापर करून त्याला जीवदान दिले.
या रुग्णालयाचे सल्लागार डॉक्टर प्रदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जन्मानंतर लगेचच नवजात अर्भकाची तपासणी केली जाते आणि त्याच्या शरीरातील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत की नाहीत हे पाहिले जाते. या नवजात अर्भकाच्या जन्मानंतर एका मिनिटानंतर हृदयाची धडधड सुरू झाली. पण तो श्वास घेत नव्हता त्याला पहिला श्वास घेण्यास तब्बल अकरा मिनिटे लागली प्रदीप कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे 2% अर्भकांना अशा प्रकारचा त्रास जाणवतो.
डॉक्टर्सनी कुलिंग थेरपी या उपचार पद्धतीचा वापर करून अर्भकाला जीवदान दिले मातेच्या गर्भारपणाच्या काळात रक्तप्रवाह जर व्यवस्थितपाने नियंत्रित होत नसेल तर गर्भावर अशा प्रकारचा परिणाम होतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या रुग्णालयातील बाल रोग तज्ञ डॉक्टर सुषमा कल्याणी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या नवजात अर्भकाला 72 तास अतिशय थंड अशा वातावरणात ठेवण्यात आले. पुढचे बारा तास हे तापमान हळूहळू वाढवण्यात आले. या कालावधीत त्याच्या शरीरातील यंत्रणांवर नजर ठेवण्यात आली. जेव्हा त्याची श्वास घेण्याची यंत्रणा नियमित झाली. तेव्हा त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आता या अर्भकाची प्रकृती अतिशय उत्तम असल्याचे सांगण्यात येते.