मुंबई – जिल्हा बॅंकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी आणि माझे सहकारी प्रकाश मोरे यांची निवड जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने केली आहे. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याचं व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही आणि आमचे सहकारी त्या चौकटीत बसत असल्यानेच आमच्या खांद्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्वीकृत संचालकपदी नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईतील बंगल्याला देण्यात आलेल्या नोटीशीवर बोलताना ते म्हणाले की, नोटीस पाठवली आहे तर कायदेशीर गोष्टीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार. प्रसारमाध्यमांसमोर उत्तर देणे चौकटीत बसत नाही. जे या सरकारविरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात मैदानात लढायला घाबरत आहेत. मैदानात हारायचं आणि शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना अंगावर येण्यापासून थांबवत नाही, पण आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.