मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंदमुळे शिवसेनेमध्ये उभी आडवी फूट पडली आहे. शिंदे यांना पक्षातील बहुतांश आमदार, खासदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. बंडाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे शिंदे यांचे मनोबल देखील चांगलेच उंचावले असून त्यांनी थेट शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिवसेनेतील या वादळी घडामोडींमुळे ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळतोय. अशातच आता दोन्ही नेते पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी निमित्त्त आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे. ( eknath shinde uddhav thackeray on dasara melava )
शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्याने यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच आज शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आज दसरा मेळाव्यावर शिंदे गटाचाच हक्क असल्याचं वक्तव्य केलं आहे. म्हस्के ( naresh mhaske ) यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
काय म्हणाले म्हस्के? ( naresh mhaske on dasara melava )
“हिंदुत्ववादी विचारसरणीचा दसरा मेळावा व्हायचा! आता ज्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडला त्यांचा दसरा मेळाव्यावर हक्क कुठला? आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील.” असं नरेश म्हस्के यांनी म्हंटलंय.
दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार – आदित्य ठाकरे
जे दसरा मेळाव्यावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडले
यावेळी बोलताना म्हस्के ( naresh mhaske ) यांनी, “हिंदुत्ववादी विचारसरणीचं सोनं लूटण्यासाठी वाजतगाजत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात सामील व्हा, अशा पद्धतीने दसरा मेळाव्याची सुरुवात व्हायची. आता हिंदुत्ववादी विचारसणीचे विचार कोणाचे आहेत. शिंदे साहेब नेतृत्व करत असलेले लोक हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे. जे दसरा मेळाव्यावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडले आहेत. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचाच” असा दावा देखील केला आहे. ( eknath shinde uddhav thackeray on dasara melava )
शिंदे-फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया…
दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी, ‘दसरा मेळाव्याला अजून वेळ आहे. तेव्हाच तेव्हा बघू’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी दसरा मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले नसले तरी दसरा मेळावा घेणार नसल्याचेही म्हंटले नसल्याने हा विषय तसाच झुलत राहिला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी, ‘जे योग्य असेल ते होईल. शिंदे अथवा ठाकरे दसरा मेळावा घेणार आहेत की नाहीत याबाबत माहिती नसल्याचं म्हंटल.’