Shivsena – Sambahji Brigade Alliance – राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या शिवसेना – संभाजी ब्रिगेड युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका संयुक्त पत्रकारपरिषदेत “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू” असं म्हणत या युतीची घोषणा केली होती. युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गट व भाजप नेत्यांनी सडकून टीका केली होती. ठाकरेंवर टीका करणाऱ्यांच्या यादीत आणखी एक नाव होत, ते म्हणजे खासदार नवनीत राणा. नवनीत राणांच्या टीकेला आता शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. ( shushma andhare reply to navneet rana )
शिवसेना – संभाजी ब्रिगेडच्या युतीवर टीकास्त्र धाडताना नवनीत राणा यांनी, “संभाजी ब्रिगेडचे काम जोरदार आहे. त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो. पण उद्भव ठाकरे यांच्यात दम नाही. दम असता तर ते घरात बसले नसते.” असं म्हंटलं होत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आता नवनीत राणांना प्रत्युत्तर दिलंय.
“आमच्या गावाकडे एक म्हण आहे, ‘ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार’ आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोनासारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलेय.” असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राणांवर पलटवार केलाय.
उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही म्हणणाऱ्या राणांवर सुषमा अंधारेंचा पलटवार ( shushma andhare reply to navneet rana )
उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही म्हणणाऱ्या नवनीत राणांवर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे यांनी “उद्धवजी त्यांच्या घरात महाराष्ट्रात होते. त्यांचं टुरिंग टॉकीज नाही – सुरत, गुवाहाटी, गोवा आणि दिल्लीत जाऊन चौकिदारी करायला. उलट महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे राज्यपाल, देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, गुजरात – आसाम – गोवा अशा तीन तीन राज्यांची गृह मंत्रालय, एका राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, १०५ आमदार, ४० बंडखोर, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि हजारो लावारिस पेड ट्रोलर्स यांना कामाला लावायला फार दम लागतो नवनीत मॅडम.” असं म्हंटल.