पुणे – डॉक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणात शहर पोलीस दलातील एका पोलिसासह आठ जणांवर खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित पोलिसाचा जमीन अर्ज फेटाळून लावला आहे.
समीर जगन्नाथ थोरात (वय 32, रा. स्वारगेट पोलिस लाईन) असे या पोलिसाचे नाव आहे. त्याने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. थोरात याच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी होती. त्यावेळी संबंधित टोळीतील आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती.
याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी आतापर्यंत जार जणांना अटक केली आहे. त्यात पोलीस कर्मचारी समीर थोरात, पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास ऊर्फ भागूदास अवचिते आणि आरती चव्हाण यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर (सर्व रा. बारामती) हे फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान थोरात याच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल नसून, त्यामुळे त्यास मोक्का कायदा लागू होत नाही. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे ऍड. ठोंबरे यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त कल्याण विधाते पुढील तपास करत आहेत.