ओतूर -येथे शुक्रवारी (दि.5) एकाच कुटुंबातील दोघे भाऊ पॉझिटिव्ह आढळल्यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील तीन सदस्य, गावातील एक डॉक्टर, एक पॅथॉलॉजिस्ट, अशा पाचजणांना तपासणीकरिता लेण्याद्री येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, लेण्याद्री येथे शनिवारी (दि.6) बाधिताच्या संपर्कातील तीन शिक्षकांच्या घशाचे नमुने पाठविल्याची माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीहरी सारोक्ते व सरपंच संतोष तांबे यांनी दिली.
दोघा भावापैकी एक बाधित माळशेज घाटानजिक खुबी फाट्याजवळ दि. 18 ते दि. 2 जून या कालावधीत चेक नाक्यावर ड्युटीवर होता. त्याला (दि.30) मे रोजी त्रास जाणवू लागल्याने तो ओतूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. संबंधित डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला ओतूरच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो (दि.1) प्राथमिक आरोग्य केंद्रात आला.
लेण्याद्री येथे त्याच्या घशाचे नमुने घेण्यात आले. शुक्रवारी (दि.5) तो पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, संबंधित रुग्णाच्या भावाला करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्याचेही घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांपैकी एकाला तात्काळ पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे. लेण्याद्रीत एकावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील रुग्णांच्या संपर्कातील पाचजणांचा अहवाल शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तर त्या तीन शिक्षकांचा रिपोर्ट रविवारी रात्री दहापर्यंत मिळण्याचे अपेक्षित आहे. संबंधित डॉक्टर व पॅथॉलॉजिस्ट यांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या डॉक्टरांचा दवाखाना 14 दिवसांसाठी सील केला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण केले आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी पाचजणांना रविवारी लेण्याद्रीला तपासणीसाठी पाठविणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.